कसे भास होत असतात मला
कसे कसे सुंगध पसरतात मनात माझ्या
तू आठवत राहतेस संध्याकाळी
तिन्हीसांजेला,
कशी हलके हलके उतरतेस मनात माझ्या
ह्या खिन्न वेळी ,कातरवेळी
अलगद पावलांनी
किती दूर आहेस तू
नि मी असा परदेशी
फक्त एकटा
माझ्या खिडकीतून बघत बसतो
हे खिन्न आभाळ
नि घराकडे परतणारी पाखरे
तुझ्या आठवणीने
किती काहूर उठतात मनात माझ्या
नि किती व्याकुळ होऊन जाते मन माझे
गच्च कल्लोळ नुसता
मी गुदमरून जातो
तुझ्या आठवणीत
हे सगळे आठवून
हलकेच कल्लोळ कमी होऊ लागतो
माझ्या मनातला
नि हलके हलके शांत होऊन जाते मन
मग अलगद उतरते संध्याकाळची प्रार्थना
पाखरासारखी निशब्दपणे
पंख मिटून
झाडा -पानात हरवून जाते
तसे तुझ्यां प्रार्थनेच्या स्वरांनी
माझेही मन होऊन जाते निशब्द
मन मिटवून
प्रार्थनेच्या स्पंदनात
No comments:
Post a Comment