अडीनडीला हाक मारता
धावत तू येशी
कृष्णसख्या रे म्हणुनी मजला
तूच आवडशी ----
नीलवर्ण ह्या तनूस शोभे
मुद्रा तव हासरी
मोरमुकुट हा मस्तकी शोभे
हाती तव बासरी ----
बासरीतुनी सुरेल सुंदर
सूर जणू फुलती
ऐकण्यास ते म्हणुनी सारे
जमती तुजभवती ----
मंत्रमुग्ध रे होऊनी जाती
सारे गहिवरती
काय करावे उमगत नाही
गुंग होई ती मती ----
तुझ्याविना या जगती नाही
दुजा कुणी आसरा
मनात माझ्या सदैव वसतो
चेहरा तव हासरा ----
कृष्ण न केवळ मूर्तीमध्ये
दडुनी की बसला
चराचरातील वस्तुजाती तो
भरुनी असे उरला
No comments:
Post a Comment