धुंद होती रात सारी धुंद होते चांदणे
धुंद होता श्वास माझा धुंद त्याचे वागणे...
धुंद या बेधुंद रात्री सूर होई बावरा
अन तुझ्याही आठवाचे काळजाशी लागणे...
या अश्या एकांतवेळी शब्द येई भेटण्या
पेरतो मी कागदांवर चांदण्यांचे सांगणे...
ओळखीचे लोक सारे ना कुणीही ओळखे
पाहुनी माझ्या दशेला आरश्याचे हासणे...
पावसाने चिंब केले आग ही विझली ज़रा
पण इथे डोळ्यात माझ्या आसवांचे जाळणे ....
शोधतो आहे अजुनी मी तिच्या खाणाखुणा
चालले आहे अजुनी दु:ख ते गोंजारणे ....
No comments:
Post a Comment