NiKi

NiKi

Wednesday, March 28, 2012

आज येथे थांबण्याला अर्थ आहे
शब्द माझे मांडण्याला अर्थ आहे

निर्झराचा भाव माझ्या बोलण्याला
ओढ असता वाहण्याला अर्थ आहे

पावलांना बंध नाही उंब-याचा
चौकटीच्या रंगण्याला अर्थ आहे

मित्र नाही येथ कोणी साधकाचा
स्वप्नदेशी दंगण्याला अर्थ आहे

कोणता ना चेहरा खोटा समोरी
आरश्याला दावण्याला अर्थ आहे

रातराणी फक्त माझ्या एकट्याची
चांदण्याच्या सांडण्याला अर्थ आहे

वाट जाते नागमोडी दूर देशी
बेफिकीरी चालण्याला अर्थ आहे

जाम माझे घोट घेई तृप्त झाला
मी हताशा झिंगण्याला अर्थ आहे?

रत्न आणि माणके ना स्वस्त येथे
आसवांना रोखण्याला अर्थ आहे

पावसाने धार व्हावे मुक्त होता
का ढगाशी भांडण्याला अर्थ आहे?

खेळ सारे तूच केले जाणले मी
सर्व काही हारण्याला अर्थ आहे

घे उशाशी मल्मली ह्या शांततेला
एक घटका झोपण्याला अर्थ आहे

भावनेला बाज येता गेयतेचा
शायरीला वाचण्याला अर्थ आहे

पास येणे, दूर जाणे पाहिले मी
बंधनांना तोडण्याला अर्थ आहे

दर्द माझा जन्म देतो शायरीला
एकट्याने जाळण्याला अर्थ आहे

स्वार्थ ज्याने साधला तो थोर झाला
गुप्त माझ्या राहण्याला अर्थ आहे

एक छोटे विश्व माझे बांधले मी
ध्वस्त होता खंगण्याला अर्थ आहे

वेड ज्याला लागले ह्या आशिकीचे
तीर वर्मी लागण्याला अर्थ आहे

देव आहे मानतो मी सर्व दूरी
आस वेडी ठेवण्याला अर्थ आहे

तोच माझा राहिला वाटे मलाही
जीवनाला पोसण्याला अर्थ आहे

अंबराचे सांडणे बेबंदशाही
सागराच्या माजण्याला अर्थ आहे


सत्य आणि झूठ झाले एक तेथे कान-डोळे झाकण्याला अर्थ आहे

एक भूमी, सूर्य अन् तो एक चंदा
प्रेमकोनी गुंतण्याला अर्थ आहे!!

No comments:

Post a Comment