NiKi

NiKi

Thursday, September 19, 2013

चल जावूया कुठे तरी लांब...शांत...जिथे कुणी नसेल. आभाळ असेल अन् तुझ्या मिठीत मी असेन.
शब्दही मोजकेच असतील पण, तरीही बोलणं खूप असेल. बोलणं तेही डोळ्याने, श्वासाने, स्पर्शाने.
खूप दिवस मनात जे काही ठेवलंय ना, ते सगळं बोलू. इतर वेळी ऐकत नाही तर आता तरी ऐकू.
स्वतःला विसरून एकमेकांतल्या स्वतःला भेटू. मलाही बघायचंय कशी आहे तुझ्या मनातली माझी सावली, माझी आकृती.
मनातल्या मनात खूप बोलत असशील ना माझ्याशी? पण माझ्या कानी पडत ते? आज तुझ्या मनात जाऊन ऐकू दे ते सगळं.
समोरच्या लाटा जवळ येतील तेव्हा थोडासा श्वास वाढेल माझा, ठोके वाढतील हृदयाचे पण, तू जवळच असशील ना माझ्या?
मग तुला नक्की जाणवतील ते? तू हात घट्ट धरशील मग तेव्हा माझा आणि धीर देशील की, "आहे मी तुझ्यासोबत. घाबरू नकोस."
जे काही बोलता नाही आलं या आधी, ते बोलताना थोडं पाणी येईल माझ्या डोळ्यांत...पण तू असशील ना ते पुसायला.
मग वाहू दे त्यांना.

समुद्राचं पाणी ही खारं आणि डोळ्यांतलं ही.
पण समुद्राचं पाणी किती ही अफाट असलं, तरी डोळ्यांतलं इवलसं खारं पाणी त्याहून जास्त वाहून नेतं... आपल्यालाही आणि समोरच्यालाही.

प्रश्न तुझ्याही मनात खूप असतील...जसे माझ्या मनात आहेत. तुलाही उत्तरं हवी असतील...जशी मला हवी आहेत.
या प्रश्नाच्या जाळ्यातच खूप दिवस गेले आहेत...तुझेही आणि माझेही... आणि हाती फक्त मनस्ताप आलाय... तुझ्याही आणि माझ्याही.
आज देवू या ना रे उत्तरं... एकमेकांना... एकमेकांच्या प्रश्नांची....
काही उत्तरं पटतील....काही अडतील....
जी पटतील....ती तशीच ठेव जपून....अन् जी अडतील....ती समवजून सांग...आपण ती मिळून सोडवूया....

हात सोडण्यापेक्षा प्रश्न सोडवलेले बरे ना...?
कारण......
माझं 'सगळं' तुझ्यापासून सुरु होतं...अन् तुझ्यावरच येवून संपतं.

No comments:

Post a Comment