चांदण्याच्या शुभ्रतेला प्रीतीचा सुगंध यावा
रातराणीच्या फुलाला आरक्त प्रीत रंग यावा
माझ्यात समरसून तू हे पहावे, अनुभवावे
सांग प्रिये मीलनात आणिक तुज काय हवे
कौतुकाने मुखचंद्रमा निरखीत मी बसून रहावे
बाहुपाशांच्या कडीत, तुज अधरांना मौन करावे
कल्पनेच्या कुंचल्याने सुखस्वप्न रंगवावे
सांग प्रिये आज मीलनात आणिक तुज काय हवे
तुज भेट म्हणुनि चंद्र हवा का ?
की हवा प्रीतीचा शुक्र तारा
की तारकांचा मुकुट चंदेरी
सांग माझ्या चंद्रमा तुज काय हवे
तुज कवेत घेऊन खुलवावे
निज हातांनी झुलवावे
प्रणयाचे गीत गावे
माग ना माझ्या फुला आणिक तुज काय हवे
अजुनि उरले असेल काही
हलकेच मला तू कळवावे
प्राणप्रिये मज प्राणापरते
माग आज आणिक काय हवे
No comments:
Post a Comment