तुझी सय येता सखे
दिवस सरतच नाही
तूझं येणं तर दूरच
पण मनही ऐकत नाही
तुझी सय येता सखे
मन भिरभिरते अनावर
मिटता डोळे दोन क्षण
कल्लोळ ओघळतो गालावर
तुझी सय येता सखे
चंद्र न साहवे आभाळीचा
तो आवेग सावरताना
दोला झुलतो आठवांचा
तुझी सय येता सखे
कधी मन होते बेभान
जणू मृदगंधात नाहून
बरसती धारा वळवाच्या
तुझी सय येता सखे
मज छळती पाऊसधारा
चिंब भिजूनही आसवांसवे
कोरडाच अंतरीचा पसारा
तुझी सय येता सखे
मेघ कोसळतो आठवांचा
एकेक पदर उलगडतो
भंगल्या वेड्या स्वप्नांचा
No comments:
Post a Comment