ती रुसते तेव्हा अजून थोडे गाल गुलाबी होती
अन् अधरपाकळ्या किंचित मुडपुन लाल मोगरा होती!
ती रुसते तेव्हा सुगंध वारा शांत शांतसा होतो
तो रेंगाळुन मग इथे तिथे का बावरलेला होतो?
ती रुसते तेव्हा मधुघट डोळ्यामधले झरझर भरती
मी "नको नको" म्हणतानाही ते थेंब थेंब पाझरती!
ती रुसते तेव्हा नाकावरती चढते रक्तिम लाली
मग एक मोकळी मुजोर बट ती भिरभिर करते भाली!
ती रुसते तेव्हा फक्त बोलतो सागर खळखळणारा
त्या लाटांवरती शब्द मनाचा झुरतो कळवळणारा!
ती रुसते तेव्हा उठे वेदना कुठे तेच ना कळते
मी उदासडोही विरघळतो अन् बोच अनामिक छळते!
No comments:
Post a Comment