मन वाटते अबोल...
कधी वाटते बोलके,
मन काळाकुट्ट धूर...
मन कधी शुभ्र धुके !
मन सामर्थ्याचा दावा,
मन असहाय्य धावा,
मन शिवाचे तांडव,
मन कन्हय्याचा पावा,
कित्ती वाटते आपले...
तरी असते परके !
मन काळाकुट्ट धूर...
मन कधी शुभ्र धुके !
मन आग, मन वारा,
जळ, व्योम, वसुंधरा,
मन आवसेची रात,
मन पहाटेचा तारा,
मन आषाढ-श्रावण...
मन वैशाख चटके !
मन काळाकुट्ट धूर...
मन कधी शुभ्र धुके !
मन वासनांचे मूळ,
मन आनंदाचे झाड,
जन्म म्रुत्युचे अंगण,
मन मोक्षाचे कवाड,
मन नरक यातना...
मनाठाई सर्व सुखे !
मन काळाकुट्ट धूर...
मन कधी शुभ्र धुके !
No comments:
Post a Comment